मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलातील दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची आज (दि. २० जानेवारी ) बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी.के. उपाध्याय म्हणजेच डॉ. भूषण कुमार उपाध्याय ( Bhushan Kumar Upadhyay ) यांना पदोन्नती देण्यात आली असून ते आता गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक ( Director General of home Guard ) असतील. बी. के. उपाध्याय यांची परमबीर सिंह यांच्या जागी नियुक्ती करत त्यांना पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. कुलवंत कुमार सरंगल ( Kulwant Kumar Sarangal ) यांची वाहतूकच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय व कुलवंत कुमार सरंगल यांच्या नियुक्तीचे आदेश आज काढण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी परमबीर सिंह यांना महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख करण्यात आले होते. पण, ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी 29 ऑगस्टपर्यंत रजा घेतली होती. मात्र, त्यानंतरही ते कर्तव्यावर परतले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरी संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. मार्चमध्ये परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
परमबीर सिंह यांना केले होते फरार घोषित - अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या होत्या. मुंबई आणि इतर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुटीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहत नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते हजर झाले होते.
परमबीर सिंह यांच्यावर झाली होती कारवाई - विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. परमबीर सिंह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. यासोबतच ठाणे शहराचे तत्कालीन डीएसपी पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले होते. आता परमबीर सिंह यांच्या जागी बी. के. उपाध्याय यांना पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.