मुंबई: पोलिसांना अशा धमक्या मिळत राहतात. आम्ही नेहमी सतर्क असतो. जेव्हा धमक्या मिळतात तेव्हा आम्ही तपास करतो. मुंबईवर कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मुंबईकरांनी घाबरू नये. आम्ही सक्षम आहोत असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मुंबईकरांनी सतर्क राहून कुठेही अज्ञात संशयास्पद वस्तू आढळल्यास मुंबई पोलिसांना त्याबाबत माहिती असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी आला होता ई-मेल: मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेला शुक्रवारी ई-मेल आल्याने खळबळ उडाली होती. धमकीच्या ईमेलच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध शहरांना एनआयएकडून अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान, याबाबत मुंबई पोलीस, एनआयए आणि इतर यंत्रणा याबाबत सखोल तपास करत असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली होती. ई-मेल करणाऱ्याचा तालिबानी असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत एनआयएने मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. तालिबानी नेता हक्कानीच्या आदेशानुसार ई-मेल पाठवण्यात आले असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी २६/११ सारखा हल्ला पुन्हा करू अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आला होता. असाच फोन पुन्हा एकदा आला होता. यावेळी हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. हा फोन उल्हासनगर येथून आल्याची माहिती मिळत असून मुंबई पोलिसांनी या फोनचा माग काढला होता.
संशयास्पद कॉल आला होता: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारच्या फोनद्वारे मुंबई शहरातील विविध भागात बॉम्ब पेरल्याची माहिती देण्यात आली होती. मुंबई पोलिसांना एका अज्ञात कॉलरचा संशयास्पद कॉल आला होता. त्यावेळी मुंबई शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरने दावा केला होता की, शहरातील इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीला पकडले होते.