मुंबई : पैशांच्या बाबतीत कोणावरही भरवसा ठेवण्याची स्थिती नाही, हे दाखवून देणारी घटना समोर आली आहे. विश्वासाने घरात नोकरीला ठेवलेल्या नोकराने मालकाच्या कोट्यवधीच्या संपत्तीवर डल्ला मारला.
मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार महिला आपल्या वयोवृध्द पतीसह रहावयास आहेत. 28 एप्रिलला त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात वडिलोपार्जीत दागिने व औषधोउपचाराकरीता घरात ठेवलेली रोख रक्कम ही 1 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान चोरीस गेली असल्याची तक्रार केली. त्यावरून मुलुंड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराला पोलिसांनी अटक केली आहे. अमित अनंत वामणे ( ४० वर्षे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपीने सोन्याचे दागिने, सोन्याचे डायमंड असलेले दागिने, चांदीची भांडी व रोख रक्कम 3 लाख अशी एकूण 1 कोटी अडतीस लाख तीन हजार रुपयांची मालमत्ता लंपास केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यात चोरीस गेलेली मालमत्ता मोठ्या प्रमाणात असल्याने तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले. मुलुंड पोलीस ठाण्याचे पथक यांची या गुन्ह्याच्या तपासाकरीता नेमणुक केली. त्यानंतर या पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरातील रहिवाशी यांच्याकडे चौकशी केली. गुन्ह्याचा कालावधी मोठा असल्याने तसेच तक्रारदार यांच्या घरी लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने गुन्ह्याचा छडा लावण्याकरीता अडचणी येत होत्या.
विशेष पथकाने चौकशीचे कौशल्य वापरून व गोपनीय माहितीचे आधारे तक्रारदार यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराला अटक करून चौकशी केली. त्याच्याकडे तपास करून 4 लाख 20 हजार रुपयांची चांदीची भांडी, 1 कोटी 31 लाख 83 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, सोन्याचे डायमंड असलेले दागिने आणि 2 लाख रोख रक्कम अशी एकूण 1 कोटी 37 लाख तीन हजार रुपयांची मालमत्ता ताब्यात करण्यात आली आहे. या आरोपीचा साथीदार प्रभाकर इंगळे याचा शोध पोलिसांकडून चालू आहे, अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे यांनी दिली आहे.
हेही वाचा- Anti Narcotics Squad Raid Mumbai: 'ई-सिगारेट रिफिलिंग सेंटर'वर छापेमारी, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त