मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात सेवा देणाऱ्या केरळच्या डॉक्टरांचा पगार ऑनलाइन डिपॉझिट केल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्णन अडसूळ यांनी दिली आहे. तर, आजच्या घडीला केरळच्या टीममधील फक्त 4 डॉक्टर आणि 18 नर्स रुग्णसेवा देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने जूनमध्ये केरळच्या 40 डॉक्टरांसह 25 नर्सची टीम दाखल झाली होती. 40 मधील काही डॉक्टर अल्पावधीतच निघून गेल्याने 29 डॉक्टरच प्रत्यक्षात सेव्हन हिल्समध्ये सेवा देत होते. या डॉक्टरांना किमान सहा महिन्यांकरता घेण्यात आल्याची माहिती होती. पण एका महिन्यातच तब्बल 25 डॉक्टर निघून गेले आहेत. या डॉक्टरांना पालिकेने पगार न दिल्याने डॉक्टर परत गेल्याची माहिती केरळच्या पथकाने प्रमुख डॉ. संतोष कुमार यांनी गुरुवारी दिली होती. तर, सातत्याने पाठपुरावा करुनही पगार मिळत नसल्याने डॉक्टर परतण्यास सुरुवात झाली असून आता केवळ 4 डॉक्टर आणि 18 नर्स सेवा देत आहेत. तर 4 डॉक्टरही 31 जुलैला केरळला परतणार आहेत.
डॉ. अडसूळ यांनी मात्र पगाराचा मुद्दा फेटाळून लावला आहे. काही डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी जावे लागले, तर काही कौटुंबिक कारणामुळे घरी परतल्याचे डॉ. अडसूळ यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे. तर, आजच या सर्व डॉक्टरांचा पगार ऑनलाइन पध्दतीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच त्यांचे इतर भत्तेही देण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्याचवेळी सेव्हन हिल्समध्ये रुग्णसंख्या वाढती असून डॉक्टर-नर्सची कमतरता आहेच. पण दररोज डॉक्टर-नर्सची भरती करण्याची प्रक्रिया सुरूच असते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.