मुंबई - धर्मदंड आणि राजदंड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यात एक बाजू कमी पडली तरी समाजात संतुलन राहणार नाही. अनैतिकता वाढल्यानेच मी राजकारणात आलो आहे. मात्र, मी राजकारणी नाही. मला राष्ट्रसेवा करायची आहे. म्हणून मला खासदार म्हणण्यापेक्षा गुरूच म्हणा. त्यापेक्षा दुसरा आनंद नाही, असे भावनिक आवाहन सोलापूरचे भाजप खासदार व वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मुंबईत केले.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्यावतीने मुंबईत दादर येथे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी वीरशैव समाजाचे डॉ. नीलकंट शिवाचार्य धारेश्वर, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, संघटनेचे डॉ. विजय जंगम यांच्यासह जंगम समाजातील सनदी अधिकारी, उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, की मी खासदार नाही. पुढील ५ वर्षे ही व्यथित करणार नाही. मला खासदार म्हणून नका, गुरुच म्हणा. मला केवळ राष्ट्रसेवा करायची आहे. देशातील विविध समाजाच्या प्रश्नावर मला काम करायचे आहे. त्यामुळे मी फक्त राष्ट्रसेवक आहे. म्हणूनच मी खासदार झालो आहे. मागील पाच वर्षांत मी राजकारणात येण्यासाठी नको म्हणत होतो. परंतु, यावेळी मला त्यांना नकार देता आला नाही. मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतले आणि सर्टिफिकेट पाहिल्यानंतर कामाला लागण्यास सांगितले आणि पुढे सर्व घडून आले. आता ट्रॅक बदलला असला तरी मला राष्ट्रसेवा करायची आहे.
मला अनेकजण धर्मकारण सोडून राजकारणात का आलात, असा सवाल करतात. मी त्यांना इतकेच सांगू शकतो, की ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे धर्मदंड तर दुसरा राजदंड या दोन बाजू आहेत. धर्मदंड काढला तर अनैतिकता वाढेल. राजदंड काढला तर देशातील अराजकता वाढेल. त्यामुळे देश किंवा विश्व चालवण्यासाठी दोन्ही असणे आवश्यक आहे. यापूर्वी महात्मा बसवेश्वर यांनी राजकारण आणि धर्मकारण दोन्हीही योग्यरित्या करून एक आदर्श ठेवला. तोच माझ्यासमोर असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
जंगम समाजाच्या आरक्षणासाठी त्याच्या प्रमाणपत्रासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, हा समाज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि उत्तरेतदेखील आहेत. आजही जंगम समाजाची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे त्यांचा विकास झाला पाहिजे. वीरशैव बंधू कुठल्याही क्षेत्रात आपली चुणूक प्रतिभा दाखवली पाहिजे. त्यासोबत जंगम तत्व कदापी सोडू नये. एक व्यक्ती काही करू शकत नाही. परंतु संघ शक्ती वाढवली तर काहीही करू शकतो. संघ शक्ती वाढवल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे समाजात ही शक्ती वाढवा, असे आवाहन जयसिद्धेश्वर स्वामी यांनी यावेळी केले.