मुंबई - फाटक्यांशिवाय दिवाळी, अशी कल्पना कुणी याआधी केली देखील नसेल. पण यंदा मात्र मोठ्या संख्येने नागरिकांनी जाणीवपूर्वक आणि कोरोना संकटाचे भान राखत तसेच मुंबई महानगर पालिकेच्या फटाकेबंदीच्या आदेशाचे पालन करत फटाक्यांना 'फाटा' देत दिवाळी साजरी केली. तर काहींनी नियमांच्या मर्यादा राखत कमी आवजाचे फटाके वाजवले. परिणामी यंदा मुंबईत ध्वनीप्रदूषण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूपच कमी दिसल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमेरा अब्दुलाली यांनी दिली आहे. काल (शनिवार), लक्ष्मी पूजनच्या दिवशी मुंबईत सरासरी 105 डेसिबल आवाजाची पातळी नोंदवली गेली आहे. ही पातळी मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी असून यासाठी मुंबईकरांचे नक्कीच कौतुक करायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यानिमित्ताने दिली आहे.
यंदा कोरोनामुळे फटाके उडवण्यावर अनेक निर्बंध
मार्चपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामाना करत आहे. या कोरोनाने आतापर्यंत लाखो जणांचा बळी घेतला आहे. तर हा जीवघेणा आजार मुळात श्वसनाचा आजार आहे. अशावेळी दिवाळीत फाटक्यामुळे होणारे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कोरोनाचे संकट वाढवेल, अशी भीती आधीपासून व्यक्त होत होती. शिवाय ज्यांना कोरोना झाला आहे वा कोरोनामुक्तीनंतर ज्यांना श्वसनाचे आजार जडले आहेत, त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो. तर कोरोना रुग्णांची संख्याही वाढू शकते, अशी भीती व्यक्त करत राज्याच्या कोविड टास्क फोर्सने फाटक्यावर बंदी आणण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला होता. सरकारने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. पण बंदी मात्र आणली नव्हती.
असे असले तरी, मुंबई महानगरपालिकेने मात्र फटाक्यांवर निर्बंध आणले. त्यानुसार सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरात फटाके उडवण्यास बंदी केली. तर हौसिंग सोसायटीच्या परिसरातच फटाके फोडावे, तेही कमी वा विनाआवाजाचे फटाके उडवावे. महत्त्वाचे म्हणजे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यासाठी दोन तासांची परवानगी दिली.
आतापर्यंतच्या सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद
फटाके उडवण्यावर आलेले निर्बंध आणि कोरोनाची भीती यामुळे मुंबईकरांनी यंदा फटाके बऱ्यापैकी टाळल्याचे चित्र आहे. त्यामुळेच यंदा मुंबईत आतापर्यंतच्या सर्वात कमी आवाजाची पातळी दिवाळीत नोंदवण्यात आल्याचे सुमेरा यांनी सांगितले आहे. 2018 मध्ये 114.1 डेसीबल इतकी तर 2019 मध्ये 112.3 इतकी आवाजाची पातळी नोंदवण्यात आली आहे. तर 2017 मध्ये सर्वाधिक 117.8 इतकी आवाजाची पातळी नोंदवली गेली होती. पण यंदा लक्ष्मी पूजनच्या दिवशी अर्थात फटाके उडवण्यास परवानगी असलेल्या दिवशी 105.5 डेसीबल इतकी नोंद झाल्याचे सुमेरा यांनी दिली आहे. आवाजाच्या पातळीची नोंद करताना अनेक ठिकाणी फटाके विरहित दिवाळी साजरी झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी कमी आवाजाचे फटाके उडवले गेले. सोसायटीच्या परिसरातच फटाके उडवण्यात आल्याने त्यांचा त्रास इतरांना झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.