मुंबई - 'शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असते, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते' हे वक्तव्य मंत्री यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून या वक्तव्यावर पांघरुन घातले जात असले तरी, शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असल्याची खदखद या वक्तव्यातून जाहीर होत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महा विकास आघाडीची स्थापना केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाच्या सरकार राज्यामध्ये स्थापन होऊन जवळपास अडीच वर्षे उलटून गेली. मात्र, रविवारी ( दि. 10 एप्रिल ) राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनी अमरावतीत एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री पदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असती तर राज्याचे चित्र वेगळे असते, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी मध्ये सर्व आलबेल आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे. मात्र, आपल्या वक्तव्यामुळे शिवसेना नाराज झाली असल्याचे लक्षात येताच यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेनेकडून यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार ? - यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेकडून तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. मला वाटते शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, यशोमती ठाकूर तुम्हाला काय वाटते ?, असा सवाल शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे ( Shivsena Neelam Gorhe ) यांनी उपस्थित करत यशोमती ठाकूर यांना टोला लगावला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांमध्ये आता कलगीतुरा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाला आहे.
शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असल्याची खदखद - महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष असले तरी मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या दोन पक्षांमध्ये असायला हवी, अशी खदखद दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांमध्ये अद्यापही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी वक्तव्य काहीवेळा केली जातात. त्यातच युपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना देण्यात यावे यासाठीही संजय राऊत सातत्याने भूमिका घेतात. शिवसेनेची भूमिका काँग्रेससाठी नेहमीच अडचणीची ठरते. त्यामुळे मंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री पदावर वक्तव्य केले असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारचे उत्तम काम - यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हणाले, मागील अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे. यानंतरही चांगले काम होत राहील. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत असलेल्या आदरामुळे त्यांनी, असे भावनिक वक्तव्य केले असेल. मात्र, महा विकासआघाडी सरकार तीन पक्षात आहे. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत राहील.
हेही वाचा - Minister Balasaheb Thorat : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उत्तम काम सुरु, यापुढेही करत राहू'