मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचे राजकारण तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या डिग्रीचा विषय लावून धरल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील विरोधी पक्षांची एकजूट करणारे नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांना खडसावले. मोदींच्या डिग्रीपेक्षा देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा व्हायला हवी, अशा कानपिचक्या देखील दिल्या.
अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावरून खडे बोल सुनावत 25 हजाराचा दंड ठोठावला. सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदींच्या डिग्रीची खिल्ली उडवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, कोणतेही महाविद्यालय मोदींना डिग्री दिली हे सांगायला गर्वाने पुढे येणार नाही, असा खोचक टोला लगावत चौफेर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकार परिषदेत छेडले असता, पवारांच्या रागाचा पारा वाढला. महागाई, बेरोजगारी, गरिबी यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात आहेत. यावर लक्ष देऊन चर्चा घडवून आणायला हवी. अनावश्यक मुद्द्यांवर कधीही चर्चा होऊ शकत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे आणि केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
जेपीसीवरूनही भूमिका बदलली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २० हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून उद्योगपती गौतम अदानी यांना अडचणीत आणले आहे. विरोधकांनी संसदेत हा मुद्दा लावून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोंडी केली. राहुल गांधी यांना निलंबित करण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी यावरून भाजप डरपोक असल्याची टीका करत जेपीसी चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या चौकशीला विरोध दर्शवत उद्योगपतींचे खच्चीकरण करू नका, असा सल्ला दिला.
पवारांनी भूमिका घ्यावी - देशातील अनेक उद्योजक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. काहींना अटक झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. गौतम अदानी यांची देखील चौकशी व्हावी. परंतु अदानींना मोकळे सोडण्यात येत आहे, हा प्रश्न आहे. जो न्याय अदानींना तो इतर उद्योगपतींना द्या. अशी मागणीही आता दबक्या आवाजात विविध पक्षांकडून होत आहे. शरद पवार यांनी याबाबत भूमिका घ्यावी अशीही गळ घालण्यात येत आहे.