मुंबई: सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे अचानक राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला जाणे, या संदर्भात गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणे किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावून घेणे, हे राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सलग ३ दिवसांची रजा घेतली. या ३ दिवसांमध्ये त्यांनी सलग पूजा केली म्हणे… तर पूजा वगैरे कशासाठी होत आहेत, याचा काय अर्थ लावला पाहिजे; पण याबाबत ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेले असेल, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
फडणवीस यांचा पुन्हा येण्यासाठी प्रयत्न: सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या आहेत की, यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सत्तेत मुख्य पदावर येण्यासाठी आपल्या जिवाचा आटापिटा केला होता. आता पुन्हा येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली. आता बास झाले, असे सांगितले आहे. कारण, फडणवीसांच्या सध्या सुरू असलेल्या उठाठेवीमुळे भाजपची प्रतिमा खराब झाली आहे, असेही अंधारे म्हणाल्या. त्याचबरोबर आताच झालेल्या विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालानंतर यांचा 'बाजार'च उठला आहे, असा टोलाही अंधारेंनी लगावला आहे.
राजकीय चर्चांना उधाण: महाराष्ट्रात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारणासाठी राज्यात नवे तर देशात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या (उबाठा) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.
भाजप शिंदेंना नारळ देणार? उद्धव ठाकरे सेनेतील उरलेले १३ आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. सामंतांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदारांवर भाष्य करण्यापेक्षा भाजप शिंदेंना सोडचिठ्ठी देणार का? याचे उत्तर त्यांनी शोधावे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: karnataka elections 2023 : पंतप्रधान भारताच्या सिलिकॉनमध्ये ८ किमीचा रोड शो सुरू, परिसर झाला भगवामय