मुंबई : सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथविधी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला. पण पुढेही तसा प्रसंग आला तर, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी तयार होतील असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
अजित पवार यांच्या सोबत सत्ता स्थापन केली. ही मोठी चूक होती असं दोन दिवसांपूर्वी एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधत एकनाथ खडसेंनी फडणवीस यांना चिमटा काढलाय. पुन्हा एकदा असाच प्रसंग आला तर, देवेंद्र फडणवीस मागेपुढे न पाहता पुन्हा एकदा सत्ता स्थापन करतील. कारण सत्तेत नसल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत, असा टोला एकनाथ खडसेंनी फडणवीसांना लावला आहे.
एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला विश्वास
महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली तेव्हा पासून, चंद्रकांत पाटील नेहमीच आघाडी सरकार पडणार असे वक्तव्य करत असतात. मात्र हे सरकार मजबूत सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास आहे एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हे सरकार पडण्याची केवळ स्वप्ने पाहत आहेत. मात्र ते स्वप्न पूर्ण होणार नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा- ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात कोणीही राजकारण करू नये - मंत्री छगन भुजबळ