मुंबई - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ( Karnataka Chief Minister ) महाराष्ट्रातील दोन शहरांवर केलेला दावा निरर्थक आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा उपसभापती नीलम गोऱ्हे ( Dr. Neelam Gorhe ) यांनी तीव्र शब्दांत निषेध करत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा समाचार ( Neelam Gorhe criticized Karnataka Chief Minister ) घेतला.
कर्नाटकडून दिशाभूल - महाराष्ट्रात अक्कलकोट, सोलापूर सारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक स्थलांतरीत नागरिक राहत आहेत. आता हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग बनले आहेत. न्यायालयात या प्रश्नावर सुरू असलेली चौकशी आता ऐरणीवर आली आहे. स्वतकडील लंगडी बाजू लपविण्यासाठी कर्नाटकने अशा प्रकारे विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अशी उलट सुलट विधाने करून जनतेची दिशाभूल करणे, अशा प्रकारे केंद्र सरकारच्या कामाची पद्धत असल्याचे दिसून येत असल्याचे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले.
समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न - समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. पाकिस्तान देखील अशा प्रकारे काम करताना दिसत आहे. दररोज एक चौकी काबीज करून हा पाकिस्तानचा भाग आहे, असे म्हणण्यासारखे वक्तव्य हे कर्नाटक सरकार करीत आहे. याकरिता केंद्राने वेळीच कर्नाटकला चाप लावण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दाखवावी. तसे होणार नसेल तर महाराष्ट्र देखील याबाबत प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
केंद्राचे कर्नाटक प्रश्नावर राजकारण - केंद्र सरकार या प्रश्नावर दोन्ही हातात लोण्याचा गोळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला कर्नाटक सरकारमधील जनतेची मते मिळवायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेला देखील बेळगाव तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सांगून काहीतरी आश्वासने द्यायची, केंद्राची ही राजनीती सुरू आहे, असे गोऱ्हे म्हणाल्या.