मुंबई - महानगरपालिकेतील उपायुक्त पदावरील एका अधिकाऱ्याचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या अधिकाऱ्याला सोमवारीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. त्यामुळे ते घरीच होते. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले अधिकारी माहीमला राहतात. त्यांना सोमवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाने कळविले होते. त्यावर त्यांनी मला काही लक्षणे नाहीत, मी घरीच राहतो, असे सांगितले होते. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. या उपायुक्तांकडे मुंबईच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी होती.
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजाराच्या जवळ पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 1 हजार 700 वर गेला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, सुरक्षा राखणारे पोलीस या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईमध्ये खासगी रुग्णालयातील 2 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेतील 5 सुरक्षा रक्षकांचा मृत्यूही कोरोनामुळे झाला आहे. तसेच मुंबईत पालिकेकडून अन्न वाटप करणाऱ्या निरीक्षकाचाही मृत्यू झाला आहे.