मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा सुरू झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा संशयित आहेत त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे. संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचे गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितले असतानाही, मशाली पेटवून लहान मुले, महिलांना सोबत घेऊन झुंडीने रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणे, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.