मुंबई - कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतांना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे की, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणे, दररोज वाढणारे मृत्यू रोखणे, आरोग्य, पोलीस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणे, टाळाबंदीने ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणे, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणे हे आता तुमचे कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणे टाळले तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर उतरुन गर्दी करणे टाळावे. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात आरोग्य, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेने काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! धारावीत वास्तव्यास असलेले 'ते' लोक केरळ आणि चेन्नईला गेल्याचा संशय