मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ,‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाचा, मदतकार्याचा आढावा घेणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खडसे यांचा राष्ट्रवादी भवन येथे पक्ष प्रवेश सुरू असताना अजित पवार मात्र गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे, असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.