नवी दिल्ली - मोदींच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या ७ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला ४ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रीपदे आली.
मोदींच्या नव्या मंत्रीमडळात वरच्या फळीत मोठे फेरबदल करण्यात आले. मात्र, महाराष्ट्राचे नितीन गडकरी यांच्याकडे असलेले खाते कायम ठेवण्यात आले आहे. तर पीयुष गोयल यांच्याकडे पूर्वीच्या सरकारमधील महाराष्ट्राचेच सुरेश प्रभू यांच्याकडील रेल्वे खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, प्रकाश जावडेकरांकडे माहिती, प्रसारण, हवामान आणि पर्यावरण या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या अनंत गिते यांच्याकडील अवजड उद्योग मंत्रीपद सेनेच्याच अरविंद सावंतांकडे देण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झालेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण, अन्न आणि पुरवठा मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे पूर्वीच्या मंत्रीमंडळातही त्याच खात्याचे मंत्रीपद होते. मात्र, वर्षभरातच त्यांच्याकडून तो पदभार काढून त्यांना राज्याचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. तर लोकसभेचा एकही सदस्य नसलेल्या रामदास आठवलेंची सामाजीक न्याय खात्याच्या राज्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. नवीन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, माहिती प्रसारण आणि माहिती तंत्रज्ञान खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.