मुंबई - मार्चमध्ये सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या घटत असून परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. याअनुषंगाने आता राज्यातील वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची गरजही कमी झाली आहे. त्यामुळेच दहा दिवसांपूर्वी जिथे दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होते तिथे आज दिवसाला 1400 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्याची माहिती डी आर गहाणे, सहआयुक्त, (औषध), मुख्यालय, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी दिली आहे. किमान 500 मेट्रिक टन ऑक्सिजनची टंचाई मागील महिनाभर राज्यात होती. तर ही टंचाई दूर करण्यासाठी एफडीएला मोठी कसरत करावी लागत होती. पण आता मात्र हळूहळू ऑक्सिजनची मागणी कमी होत आहे, ही राज्यासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
राज्यात सध्या 1350 मेट्रिक टनाचे उत्पादन -
कोरोना हा श्वसनाचा आजार आहे. त्यामुळे फुफ्फुसामधील संसर्ग वाढल्यास रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिवसाला 850 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. मात्र त्याचवेळी राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत होती. तर यातील अंदाजे 40 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध होत होता. पण ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सरकारने 80 टक्के वैद्यकीय तर 20 टक्के औद्योगिक वापरासाठी असा ऑक्सिजनचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे पहिल्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा काही दिवसांतच दूर झाला. पण दुसऱ्या लाटेत मात्र परिस्थिती गंभीर झाली. कारण पहिल्या लाटेत जिथे 25 ते 28 हजार रुग्ण दिवसाला आढळत होते तिथे दुसऱ्या लाटेत 60 हजाराहून अधिक रुग्ण दिवसाला आढळू लागले. तर सक्रिय रुग्णांचा आकडा सहा ते साडे लाखावर गेला. यातील 10 टक्के गंभीर रुग्णांना ऑक्सिजन लागू लागला. याअनुषंगाने दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला. पण राज्यात केवळ 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत असताना 1700 ते 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन कसा उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न एफडीएसमोर उभा ठाकला. यातूनच मोठ्या प्रयत्नाने ऑक्सिजनचे उत्पादन 150 मेट्रिक टनने वाढवले. बंद कंपन्या सुरू करत, काही कंपन्याकडून उत्पादन वाढवत 150 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा एफडीएने आता वाढवला आहे. तर उर्वरित ऑक्सिजन इतर राज्यातून मागवण्यात येत आहे.
आता ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. 1800 मेट्रिक टन वरून आता दिवसाची मागणी 1400 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. पुढे यात आणखी घट होणार आहे. पण तज्ज्ञांनी आता सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी असेल अशी भीतीही व्यक्त होत आहे. त्यातही लहान मुलांना या लाटेचा अधिक धोका असेल असे म्हटले जात आहे. तेव्हा या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आणि लहानग्यांना या लाटेपासून वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यात एनआयसीयु आणि पीआयसीयु बेड्स वाढवले जात आहेत. पीडियट्रिक वॉर्ड, कोविड सेंटर तयार केले जात आहेत. तेव्हा एफडीएकडूनही ऑक्सिजनचा तुटवडा या तिसऱ्या लाटेत भासणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ऑक्सिजनचे प्लांट वाढवत ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्याचा एफडीएचा प्रयत्न आहे.