मुंबई - पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील व्यवहारांवरील निर्बंधामुळे ग्राहकांना दर महिन्याला काही ठराविक प्रमाणातच पैसे काढता येणार आहेत. या निर्णयानंतर मंगळवारी पैसे काढण्यासाठी खातेधारकांच्या बँके बाहेर रांगा लागल्या होत्या. या निर्णयाविरोधात ग्राहकांमध्ये संताप पहायला मिळत आहे. आज सायन कोळीवाड्यातील पीएमसी खातेधारकांनी बँकेच्या चेअरमनसह बोर्डावरील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी सायन पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
हेही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले
खातेधारकांनी कष्टाने जमवलेल्या पैशांचा बँकेने गैरव्यवहार केला. हक्काचे पैसै मिळवण्यासाठी खातेधारकांना धडपड करावी लागत आहे. हा मनस्ताप लोकांना दिल्याबद्दल बँक अधिकाऱ्यांना देषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दखल करावा, अशी मागणी खातेधारकांनी केली आहे. बँकेवर निर्बंध आल्याचे वृत्त कळताच बँकेच्या सर्वच शाखांकडे ग्राहकांचा अक्षरश: लोंढा उसळला होता. हजारो ग्राहकांच्या असंतोष आणि उद्वेगाचा सामना बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.