मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ११.८ किमी लांबीच्या ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या बांधकामासाठी दोन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. ठाणे आणि बोरिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पावर सुमारे ११,२३५ कोटींचा खर्च होणार आहे. याबाबतची निविदा प्रकिया पूर्ण करून पुढील ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाणे बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार : या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली प्रवासातील दीड ते दोन तासांचा वेळ अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.
सुरुवातीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग हाती घेतला होता. पण पाच वर्षात हा प्रकल्प त्यांना मार्गी लावता न आल्याने २०२१ मध्ये राज्य सरकारने हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला. सध्या ठाणे येथून बोरिवलीला जाण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतो. वाहतुकीचा पिक पॉइंटला या प्रवासासाठी दोन तास लागतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी-वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून आता सुटका होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
जंगल मार्गामुळे पुन्हा सर्वेक्षणाचे निर्देश : हा मार्ग जंगलातून जात असल्याने पर्यावरण, वन्यजीवांना धोका पोहोचू शकतो ही बाब लक्षात घेऊन सरकारने प्रकल्पाविषयी पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्याच्या प्रक्रियेला वेळ लागल्याने प्रकल्पाचे काम रेंगाळले होते अखेरीस एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा जारी केल्या आहेत.
दोन निविदा प्रसिद्ध : एम एम आर डी येणे या प्रकल्पासाठी दोन वेगळ्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात ११.८ किमीचा हा भूमिगत मार्ग आणि यातील १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे अशा कामांसाठी दोन निविदा मागविण्यात आली आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असून यात येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन अशा सहा मार्गिका असणार आहेत. टेंडर प्रकिया येत्या लवकरात लवकर पूर्ण करून जूनमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असून या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा : मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी; पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान मेट्रोची सेवा 'या' वेळेत असणार बंद