मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 4 महिन्यांपासून देशात सिनेमा हॉल्स, मॉल्स आणि इतर करमणुकीची साधने बंद आहेत. यामुळे घरात थांबलेले नागरिक करमणुकीसाठी नेटफ्लिक्ससारख्या डिजिटल माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना पाहायला मिळत आहेत. भारतात सध्या नेटफ्लिक्स वापरकर्त्यांची संख्या ही जवळपास 20 लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक वापर होत आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या पैशांची लूट आणि डेटा चोरी करत असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.
गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्ससारख्या माध्यमाचा वापर करणाऱ्या हजारो वापरकर्त्यांना त्यांच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनच्या संदर्भात बनावट एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नेटफ्लिक्सची सदस्यता वैयक्तिक माहिती नीट न दिल्याने स्थगित केली गेली आहे. नेटफ्लिक्सच्या बिल पेमेंट संदर्भात भरणा करणे गरजेचे आहे. अन्यथा 24 तासांत नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन रद्द होईल, असे सांगितले जात आहे. यासाठी सायबर गुन्हेगार हे बनावट पेमेंट गेटवेची लिंकसुद्धा नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना पाठवून त्यांच्या बँकिंग संदर्भात, डेबिट आणि क्रेडिट कार्ड संदर्भात सर्व माहिती चोरत असल्याचे राज्याच्या सायबर विभागाच्या निदर्शनास आले आहे.
कसा चोरला जातोय डेटा -
सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांच्या मतानुसार नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना त्यांची सदस्यता 24 तासांत रद्द करण्याचा दावा करुन त्यांचे बिल पेमेंट पूर्ण करण्यासाठी बनावट पेमेंट गेटवेची लिंक पाठवली जाते. एकदा वापरकर्त्याने या लिंकवर क्लिक केले की, वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाइटवर नेले जाते. वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील पेमेंट गेटवेवर देण्यास सांगितले जाते. या दरम्यान, नेटफ्लिक्स वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल वेबसाइटवर नेले जाते आणि याप्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो.
काय करायला हवे?
- 1) सायबर फिशर्सना ओरिजिनल कंपनीचा लोगो वापरकर्त्यांना फसवण्यासाठी कशा प्रकारे वापरायचे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून नागरिकांनी कुठल्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करावा.
- 2) अशा वेळी तुम्हाला आलेला ई-मेल आणि त्याचा ई-मेल आयडी हा काळजीपूर्वक तपासा.
- 3) सगळ्याच वेबसाईट ओरिजिनल नसतात. त्यामुळे सगळ्याच वेबसाईटवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद ई-मेलमधील अटॅचमेंट डाऊनलोड करू नका.
- 4) आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इत्यादी तपशील कोणाशीही शेअर करू नका. अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी ओरिजिनल नेटफ्लिक्स वेबसाइट वर जा आणि आपले बिल पेमेन्ट इत्यादी तपशील पडताळून बघा.