मुंबई : लॉकडाऊनमध्ये वीज मीटर रिडींग न घेता आल्याने आता महावितरणने जानेवारी ते मार्च 2020 या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी बिल पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर, तीन महिन्यानंतर हातात आलेल्या बिलाची रक्कम पाहून अनेकांना भोवळ येत आहे. महावितरणने अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवत ग्राहकांना शॉक देण्यास सुरुवात केली आहे. पण, आता एका ग्राहकानेच कायदेशीर नोटीस बजावत महावितरणला शॉक दिला आहे. या नोटिशीनुसार बिल आकारणी चुकीची करण्यात आली असून अशी आकारणी कशाच्या आधारावर करण्यात आली आहे याची विचारणा त्याने महावितरणकडे केली आहे.
कल्याणमध्ये राहणारे शिव सहाय सिंग यांना नुकतेच 7 हजार 60 रुपये इतके वीजबिल आले आहे. त्यांनी मार्चमध्ये 1 हजार 240, एप्रिलमध्ये 940 आणि मे मध्ये 1 हजार 220 रुपये असे ऑनलाइन वीजबिल भरले. मात्र, त्यानंतरही त्यांना जूनमध्ये 7 हजार 60 रुपये इतके बिल आले आहे. या बिलाचा त्यांच्या मुलाने बारकाईने अभ्यास केला. यावेळी, बिलाची आकारणी चुकीच्या पद्धतीने करत महावितरण ग्राहकांची लूट करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी ट्विटरवर यासंबंधी तक्रार केली. पण, काही उत्तर न मिळाल्याने त्यांच्या मुलाने कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजच नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सिंग यांचे वकील अॅड प्रकाश रोहिरा यांनी दिली आहे.
रोहिरा यांच्या म्हणण्याप्रमाणे मीटर रिडींगनुसार सरासरी जी बिल आकारणी करण्यात आली आहे ती चुकीची आहे. बिल आकारणी चुकीची लावत ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. जानेवारी ते मार्च 2020 च्या वीज वापराच्या सरासरी युनिटनुसार बिल आकारण्यात येत असल्याचे महावितरण सांगत आहे. असे असेल तर सिंग यांचे बिल 5 हजार रुपयांच्या आत यायला हवे. पण ते 7 हजार 60 रुपये इतके आले आहे. एकूणच ही लूट असून त्यामुळेच आम्ही हे बिल कसे आकारण्यात आले, असा सवाल केल्याचेही अॅड. रोहिरा यांनी सांगितले आहे.
याविषयी महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला. दरम्यान ज्यांना ही लूट समजेल ते महावितरणकडून बिल कमी करून घेतील. पण ज्यांना काही समजणार नाही ते बिल भरून टाकतील आणि त्यांची लूट होईल. तेव्हा या नोटिशीनुसार बिल आकारणीची योग्य माहिती समोर आली आणि महावितरणने आपली चूक मान्य केली. तर, सर्वच ग्राहकांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.