मुंबई - लॉकडाऊनमुळे राज्यात बांधकाम पूर्णपणे ठप्प असून बांधकाम व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यातून बाहेर येण्यासाठी किती महिने लागणार? हे काही सांगता येत नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आणि व्यवसायाला दिलासा देण्यासाठी पुढचे 4 महिने सर्व प्रकारच्या मालमत्ता व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात 1 टक्के कपात करावी, अशी मागणी एमसीएच-क्रेडाईने राज्य सरकारकडे केली आहे.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी काही बांधकाम मजूर मुंबई-महाराष्ट्र सोडून गेले आहेत. ते आता कधी येतील, येतील की नाही? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यानंतर बांधकाम सुरू करणे शक्य होईल की नाही, हाही प्रश्न आहे. त्यात दीड महिना काम बंद असून पुढे आणखी काही महिने काम बंदच रहाणार आहे. तेव्हा याचा ही मोठा आर्थिक फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे.
एकूणच व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. यातून दिलासा म्हणून मालमत्ता व्यवहारावरील सर्व प्रकारच्या मुद्रांक शुल्कात पुढील 4 महिन्यांसाठी सवलत द्यावी, अशी मागणी एमसीएचआय-क्रेडायने केली आहे. महसूल मंत्र्यांना पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.