मुंबई - कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोवीन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे उघड झाले आहे. अॅपमधून पहिल्या दिवशी लस घेणाऱ्या लाभार्थ्यांना संदेश न गेल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाला रात्रभर जागून संदेश पाठवावे लागले तसेच फोनाफोनी करून लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर बोलवावे लागले. यामुळे कोवीन अॅपचा ढिसाळ कारभार निदर्शनास आला.
अॅपचा ढिसाळ कारभार
मुंबईसह राज्यात देखील लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत सुमारे सव्वा लाख वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लस घेण्यापूर्वी केंद्राच्या कोविन अॅपवर नोंदणी करणे, बंधनकारक आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी- फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 1 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांची मुंबईतून नोंदणी झाली आहे. लसीकरणाच्या आदल्या दिवशी नोंदणीकृत लाभार्थ्यांना मॅसेज पाठविण्यात येणार होते. पण, कोविन अॅपवर तांत्रिक अडचण आल्याने नोंदणीकृत लाभार्थ्यांना मॅसेजच पोहोचले नाहीत.
पालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ
पालिकेच्या आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच, प्रशासनाची धावपळ उडाली. तसेच लसीकरणाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना, यंत्रणा कामाला लागून पहाटे सहा वाजेपर्यंत मॅसेज पाठविण्यात आले. हे मॅसेज पोहोचले की नाही, याची शाश्वस्ती नसल्याने लाभार्थ्यांना फोन करून लसीकरणाच्या ठिकाणी बोलवावे लागले. अॅपचा ढिसाळ कारभार समोर आल्याने लाभार्थ्यांना लस दिल्याची वेळ आणि तारिख नोंद करण्यात आली. त्यानंतर लस घेतल्याची अॅपवर नोंद केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
खबरदारी घेतली जाईल
दरम्यान, लसीकरणाचा आज पहिलाच दिवस आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या. पण, नोंदणीकृत व्यक्तीला लस मिळावी, यासाठी प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क साधला. पुढे अशा अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा - पहिल्या दोन टप्प्यात 3 लाख 30 हजार जणांचे लसीकरण पूर्ण करणार - पालिका आयुक्त