मुंबई - महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ओपीडीमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र त्यांना खाटा रिक्त नसल्याचे कारण देत उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही. हे रुग्ण घरापासून रुग्णालयापर्यंत तसेच इतर ठिकाणी अनेक दिवस फिरत असल्याने त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत आहे. यामुळे या रुग्णांची चाचणी करून त्यांच्यावर रुग्णालयात, आयसोलेशन केंद्रात किंवा कोरोना केअर केंद्रात उपचार करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. जागोजागी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत लक्षणे असलेल्या रुग्णांपेक्षा लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास अशी कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात ओपीडीमध्ये आल्यावर त्यांना रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देऊन रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. तसेच त्यांची कोरोनाबाबतची चाचणीही केली जात नाही. त्याच परिस्थितीमध्ये कोरोनाची लक्षणे असलेले व कोरोना संशयित असलेले अनेक रुग्ण घरापासून रुग्णालयापर्यंत फिरत असतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, ते राहत असलेल्या वसाहतीमध्ये कोरोनाची लागण होण्याची भीती असल्याचे सईदा खान यांनी म्हटले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पालिका रुग्णालयात ओपीडीमध्ये उपचारसाठी आलेल्या व कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना केअर सेंटर किंवा आयसोलेशन केंद्रात ठेवावे. त्याठिकाणी त्यांची चाचणी करून त्यांच्यावर उपचार करावेत, अशी मागणी सईदा खान यांनी केली आहे.
खाटांसाठी हा आहे उपाय -
रुग्णालयात खाटा कमी पडत असल्याने कोरोनाची लागण झालेल्या व मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांनी रुग्णालयातील 30 ते 40 टक्के खाटा व्यापल्या आहेत. अशा रुग्णांवर उपचार केल्यावर त्यांना कोरोना केअर 2 केंद्रांमध्ये भरती करावे. त्याठिकाणी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करू शकतात. असे केल्याने पालिका रुग्णालयातील 30 ते 40 टक्के खाटा रिक्त होऊन लक्षणे असलेल्या रुग्णांना त्याठिकाणी भरती करून उपचार करता येऊ शकतात, असे सईदा खान यांनी म्हटले आहे.