मुंबई - मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णामुळे 40 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या नर्स केरळमधील असल्याने त्यांची काळजी घ्यावी अशी मागणी केरळचे विरोधी पक्ष नेते रमेश चेंनीथला यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबईमधील जसलोक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने ओपीडी बंद करण्यात आले असून कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केल्याचे समजते.
मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला छातीत काही त्रास होत होता. त्याची तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण चार दिवस या रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संसर्गाने 40 नर्स आणि 3 डॉक्टरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय पालिकेने आणि पोलिसांनी सिल केले आहे. रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात येण्यात मनाई करण्यात आली आहे. जोपर्यंत या रुग्णालयातील सर्व रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे. या रुग्णालयातील 270 नर्सेस आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान केरळचे विरोधी पक्ष नेते रमेश चेंनीथला यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना फोन केला. या रुग्णालयात केरळमधील 200 नर्स काम करत असून त्यापैकी 40 नर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर 150 नर्सेसना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या नर्स जीवघेण्या कोरोनाशी लढा देऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी अशी मागणी चेंनीथला यांनी केली आहे.
जसलोकमधील कर्मचारीही क्वारंटाईन -
मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा जसलोक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद करण्यात आली आहे.