मुंबई - भारतीय नौदलाच्या मुंबईतील कर्मचारी निवासस्थानात 21 खलाशी कोरोना संक्रमित झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. या 21 खलाशांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या 21 खलाशांपैकी 20 खलाशी हे आयएनएस आंग्रे युद्धनौकेला रसद पुरविणाऱ्या डेपोवर कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
नौदलाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आयएनएस आंग्रे या नौकेला रसद पुरविणाऱ्या डेपोवर कार्यरत असलेल्या एका खलाशाची वैद्यकीय चाचणी 7 एप्रिलला करण्यात आली होती. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा खलाशी ज्या आयएनएस आंग्रेमधील ब्लॉकमध्ये राहत होता, त्या ब्लॉकमधील संपर्कात आलेल्या इतर खलाशांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत एकूण 21 खलाशी हे कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. दरम्यान हा संसर्ग नौदलाच्या इतर पाणबुडी व नौकांवर पोहोचला नसल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. आयएनएस आंग्रे ही पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
काय आहे आयएनएस आंग्रे
नौदलाला लागणारी प्रशासनिक व लॉजीस्टिक मदत देण्याचे काम आयएनएस आंग्रे या प्रशासकीय इमारतीतून केले जाते. नौदलाच्या मुंबईतील विविध युद्धनौकाना व जहाजांना वेगवेगळ्या सुविधा मिळवून देण्याचे काम या इमारतीतून केले जाते. कमोडोर नेव्हल बैरेक्स नावाने सुद्धा ही इमारत ओळखली जाते. मुंबईतील नौदलाच्या कुलाबा परिसरातील निवासी व शैक्षणिक विभागांचे कामकाज आयएनएस आंग्रे या प्रशासकीय इमारतीतून पाहिले जाते.