मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. आज सोमवारी दिवसभरात धारावीत ४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ६० ते ७०पेक्षाही कमी असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १८०वर पोहोचली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियमावलीच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
धारावी सहावेळा शून्यावर -
मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले.
जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोनअंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२०मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ला दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा आणि २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
हेही वाचा - गृहमंत्री विलगीकरणात तर पत्रकार परिषद कशी घेतली? फडणवीसांचा सवाल; देशमुखांनी दिले स्पष्टीकरण
कोरोना पुन्हा वाढला -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार, अशी स्थिती असताना मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. २ फेब्रुवारीला मुंबईतील ३३४वर घसरलेली रुग्णसंख्या आता ३७७५वर गेली आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोकेवर काढले आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत सलग रुग्णसंख्या वाढते आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३०वर पोहोचली होती. आज धारावीत ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत रुग्णांची संख्या ४४४१ वर पोहोचली आहे. यातील ३९४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
माहीममध्ये ३७७ सक्रिय रुग्ण -
मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर आणि माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहीमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आतापर्यंत ५५०५ रुग्ण आढळले. यातील ५०४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे येथे आता २९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीमध्ये आतापर्यंत रुग्णांची संख्या ५४५१ वर पोहोचली आहे. यातील ४९१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. येथे ३७७ सक्रिय रुग्ण आहेत.
लसीकरण आणि चाचण्या -
मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतरही धारावीमधील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी महापालिकेने धारावीत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीत दिवसाला १ हजार लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. तसेच फेरीवाले, दूधवाला, दुकानदार आदी. ज्या लोकांचा नागरिकांशी रोज संपर्क येतो, अशा लोकांच्या चाचण्या केल्या जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला