मुंबई: मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत पालिकेने व मुंबईकरांनी कोरोनाच्या तीन लाटांवर मात केली आहे. त्यानंतर रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. मात्र गेल्या आठवडाभरात पुन्हा रुग्णांची संख्या वाढली आहे (Corona is growing in Mumbai). गेले काही दिवस ३०० च्या सुमारास असलेली रुग्ण संख्या ५०० क्या वर गेली आहे. यामुळे पालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पावसाळा समोर आला आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश (orders of Municipal Commissioner) दिले आहेत.
खासगी लॅब आणि त्यामधील कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपलब्ध करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. जंबो कोविड सेंटर, पालिका आणि खासगी रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लहान मुलांना कोरोना होऊ नये म्हणून 12 ते वयोगटातील लसीकरण मोहीम आणि बूस्टर डोस वेळेवर द्यावेत, येत्या काही दिवसांत हॉस्पिटलायझेशन वाढल्यास मालाड जम्बो सेंटर प्राधान्याने वापरण्यात यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
पालिकेच्या प्रत्येक वॉर्डच्या प्रभारी सहाय्यक समितीने वॉर्ड वॉर रूमच्या स्थितीचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. जेणेकरून ते कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांनी सुसज्ज आहेत याची खात्री करावी. प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील कोविड परिस्थितीचा दैनंदिन आढावा घ्यावा. अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जंबो रुग्णालयांना भेट देवून डी-वॉटरिंग पंप, स्ट्रक्चरल प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा यंत्रणा, हाऊस किपिंग, कॅटरिंग, पॅरामेडिकल आणि वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे आणि औषधांसह पूर्णपणे सुसज्ज आहेत याची पाहणी करावी असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.