मुंबई - राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही कोरोनाने थैमान घातले आहे. मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सॅनिटाईझसाठी मंत्रालय 3 दिवस बंद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे मंत्रालयात आज (गुरुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, बैठक सुरू असतानाच प्रधान सचिवांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची जबाबदारी देण्यात आलेल्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सचिव, सह सचिव आणि उपसचिव यांनाही क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या मंत्रालयातून सध्या 5 टक्के कर्मचाऱ्यांच्या आधारे राज्याचा कारभार चालवण्यात येत आहे. त्या मंत्रालयातच कोरोना पॉझेटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.