मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने अनेक समस्या निर्माण केल्या आहे. देशातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच झोपडपट्टी राहणाऱ्या लोकांना किराणामाल मिळण्यासंदर्भात अनेक अडचणी येत आहेत.
मुंबई
मुंबईत झोपडपट्टीत अनेक महिलांना रेशनकार्ड असून, धान्य मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. रेशन दुकानदार म्हणत आहेत, की माल आला नाही. धारावी झोपडपट्टी भागातल्या राजेश्री भालेकर यांनी सांगितले, की आम्ही भाडेकरू असल्याने आमच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे आम्हालाही धान्य मिळत नाही. तसेच विधवा, वृद्ध महिलांची अवस्था आणखी बिकट आहे. लॉकडाउन असल्यामुळे लोक सध्या घरीच आहेत. त्यामुळे घरात त्यांचं खाणं-पीणं अधिक होतं. एरवी कामानिमित्त पुरुष बाहेर असल्यामुळे त्यांचे खाणे-पीणे बाहेर होते. तर काही ठिकाणी घरातल्या पुरुषांना सकाळी एकदा कामावर जाताना डबा दिला की, काम भागत असे. मात्र, आता दिवसभर मुलं इतर सदस्य घरात असल्याने भरलेलं रेशन संपत आलं आहे, असे अंजली सोलकर या गृहिणीने सांगितले. तसेच आमचा धारावी विभाग पोलिसांनी पूर्ण सील केला आहे. त्यामुळे पुढील काळात रेशन संपलं की खायचं काय? हा प्रश्न सतावत आहे अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली.
गरीबांना उपाशी राहण्याची वेळ येवू नये म्हणून रेशन सुरु झाले. अंत्योदय आणि शहरी गरीब यांनाच सध्या रेशनवर धान्य मिळत आहे. मुस्लिमनगर या दहा बारा हजार जणांची वस्ती असलेल्या झोपडपट्टीच्या भागात चार ते पाच रेशन दुकाने आहेत. लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टनसिंग पाळण्याचा आग्रह केला जात आहे. पण सोशल डिस्टनसिंगमुळे धान्य मिळवण्यासाठी मोठी रांग लागत आहे. यात अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याची माहिती रवींद्र बारगुडे यांनी दिली.
कोल्हापूर -
कोल्हापूर शहरात किराणा मालाचा पुरेसा साठा शिल्लक आहे. शहरातील किराणा शॉप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची पालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बैठक घेतली. त्यामध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींची चर्चा केली. कोल्हापूरात अनेक ठिकाणी वसाहती आहेत. त्यात प्रामुख्याने राजेंद्र नगर, संभाजी नगर, वारे वसाहत, कावळा नाका (माकडवाला वसाहत) आहेत. यामध्ये जवळपास 5 ते 7 हजार कुटुंब राहतात. या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनासुद्धा अनेक अडचणी येत आहेत. त्यांनासुद्धा शक्य ती मदत प्रशासनाकडून दिली जात आहे. शिवाय काही सेवाभावी संस्थांकडून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा वाटप केले जात आहे. प्रभाग समित्यांना या सर्व नागरिकांवर लक्ष ठेऊन सर्वोतोपरी मदत करण्यात यावी अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.
सांगली -
संचारबंदी घोषित झाल्यानंतर सुरुवातीला किराणामाल खरेदी करण्यासाठी गोरगरिबांची मोठ्या प्रमाणात दुकानासमोर गर्दी झाली होती. सगळ्यात गरीब घटक असणारा झोपडपट्टीधारक अचानकपणे संचारबंदी लागू झाल्याने अडचणीत आला होता. त्यांच्यासमोर किराणामाल खरेदी करण्यासाठी पैशाची अडचण होती. त्यामुळे आहे तेवढ्या पैशात, मिळेल तेवढाच माल त्यांनी सुरुवातीला खरेदी केला. आता सांगली शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक सामाजिक संस्थांकडून अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनाच्या रेशन धान्य दुकानातूनही त्यांना धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.