मुंबई - कोरोना-लॉकडाऊनच्या काळात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, तर अनेकांच्या पगारात कपात झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे राजकीय नेते आणि नोकरशाहांना मात्र याचा कोणताही चटका बसताना दिसत नाही. उलट यांच्याकडून महागड्या घरांची खरेदी होताना दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने जुहूमध्ये नुकताच 33 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे, तर आता त्यापाठोपाठ राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजय मेहता यांनीही नरिमन पॉईंट येथे 5 कोटी 33 लाखांचा फ्लॅट खरेदी केला. या खरेदीसंदर्भातील कागदपत्रे 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागली आहेत.
1076 चौरस फुटांचे घर -
सरकारी दस्तऐवजानुसार मेहता यांनी 8 ऑक्टोबरला घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. नरिमन पॉईंट, मंत्रालयाजवळील समता को-ऑपरेटिंव्ह हौसिंग सोसायटी, जगन्नाथ भोसले मार्ग येथे 5 कोटी 33 लाखांचा फ्लॅट खरेदी केला आहे. 1076 चौरस फुटांचा हा फ्लॅट असून यासाठी मेहता यांनी आरटीजीएसने 2 कोटी 76 लाख रुपये भरले आहेत तर अडीच कोटीचा चेक दिला आहे. तर हा चेक पोस्ट डेटेड, 4 ऑक्टोबर 2021 अशा तारखेचा आहे. यासाठी त्यांनी 10 लाख 68 हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क त्यांनी भरले आहे, हा फ्लॅट त्यांनी पुणेस्थित अनमित्रा प्रॉपर्टीज यांच्याकडून खरेदी केला आहे.
सुभाष देसाईंच्या मुलाची जुहूत घरखरेदी -
सुभाष देसाई यांच्या मुलानेही ऑक्टोबरमध्ये जुहूत घरखरेदी केली आहे. भूषण देसाई असे त्यांच्या मुलाचे नाव असून त्यांनी जुहूतील प्राइम बीच प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 3900 चौ. फुटांचा असून यासाठी त्यांनी 33 कोटी मोजले आहेत. ही महागडी घरखरेदी मानली जात आहे. देसाई यांनी या घरासाठी 66 लाख इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. भूषण देसाई यांची ही घरखरेदी महागडी म्हणून चर्चेत आहेच, पण आणखी एका वेगळ्या कारणामुळेही ही घरखरेदी चर्चेत आली आहे. ते म्हणजे देसाई यांनी ज्या जयंत सोनी याच्याकडून हा फ्लॅट खरेदी केला आहे, तो ईडीच्या एका प्रकरणात सहआरोपी आहे. हे प्रकरण इक्बाल मिर्चीशी संबंधित आहे.