मुंबई - रेमडेसिवीर घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. तरीही मोदी सरकारने आपल्या मित्रांसाठी ते वितरित केले. ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा ताबा केंद्र सरकारने घेतला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनची कमतरता होती. त्यामुळे आपण औद्योगिक वापरातील ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी वापरले होते. पण, ज्या टाक्यांमध्ये हा ऑक्सिजन साठवून ठेवायचे त्या टाक्या साफ नव्हत्या. त्यामुळे ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस सारखे आजार निर्माण झाले आहेत, असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे.
कोरोना पहिल्या लाटेत मोदींनी धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. पण, सात वर्षांत मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या लाटेत 'नमस्ते ट्रम्प'च्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलिगी जमातवर खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे.
गरिबांनी मरावं अन् श्रीमंतांनी जगावं, असे मोदी सरकारला वाटते
नाना पटोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोरोनावर वेळीच उपययोजना केले असते तर अनेकांचे जीव वाचले असते. पण, मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशवासीयांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटले होते. असे केंद्र सरकारने का केले, असा सवाल करतानाच सूट बुटाच सरकार म्हंटल्यावर भाजपला त्रास झाला. पण, पंचतारांकित हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका ही भाजपची आहे. गरिबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जागावं असे मोदी सरकारला वाटत असेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली. बड्या उद्योगपतींचे 68 हजार कोटी रुपये केंद्र सरकार भरत आहे. फाईव्हस्टार घोटाळा तर भाजपच्या रक्तात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात आहे.
हेही वाचा - मुंबईत इंधनाच्या किमती शंभरी पार