मुंबई - देशात आणि राज्यातील भाजप इतर पक्षातील लोकांसाठी त्यांचे कारखाने, व्यवसाय आदी ठिकाणी अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे ते लोक हतबल होतात. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते अशा लोकांना आपल्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. मुंबई मराठी पत्रकारसंघात आज (सोमवारी) ते बोलत होते.
भाजपची राजनिती पाहिली असता सगळीकडे साम-दाम-दंड भेद करून यश मिळवले जात आहे. सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, गरिबांच्या मनात आजही काँग्रेस आहे, ही लढाई तत्वाची, विचाराची आहे. यावरूनच देशात दोन तत्वांचा संघर्ष सुरू आहे. जातीच्या, धर्माच्या नावावर राजकारण करणे सोपे असते. मात्र, विचारसरणीने काम करणे अवघड असते. विचारांची लढाई शाश्वत असते. त्यामुळे आम्ही ही लढाई जिंकणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
भाजपकडून आज काम करण्याचा आभास निर्माण केला जात आहे. मात्र, काँग्रेस त्याचा पर्दाफाश करणार आहे. त्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत शेतकरी, शेकाप, सीआय, सिपीआय आदी मित्रपक्ष सोबत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला देखील सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांच्या मनात असेल तर त्यांनी आघाडीसोबत यावे, असे ते म्हणाले. शिवाय मनसेचा अद्यापही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे मनसेला सोबत घ्यायचे की नाही त्यावर चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे लोक खोट्या अफवा पसरवतात. कायम वातावरण प्रदूषित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसची ताकद -
मी स्वतः ७ निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यातील जिल्हे, मतदारसंघ, विरोधी नेते तसेच कार्यकर्ते माहिती आहेत. त्याचा उपयोग येणाऱ्या काळात होणार आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता ही काँग्रेसची ताकद असल्याचे थोरात म्हणाले.
लोकसभेत एक खासदार असला तरी विधानसभेत विजय होईल -
गेल्या १९७८ ला इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे अस्तित्त्व संपुष्टात येईल, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. त्याचप्रमाणे आतादेखील कठीण परिस्थिती आहे. लोकसभेत एक खासदार निवडून आला. मग आता विधानसभेचे कसे होणार? असे प्रश्न विचारले जातात. मात्र, लोकसभा आणि विधानसभा वेगळ्या असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता नक्की काँग्रेसचा विचार करेल, असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.