मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपाच्या सत्तेत काळात बदललेल्या वॉर्डची पुन्हा पुनर्रचना करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर आघाडीचे सरकार अस्तित्वात असल्याने त्यांनी सर्व वॉर्डची पुनर्रचना करून घ्यावी व 30 जागा जिंकून दाखवाव्यात, असे खुले आवाहन भाजपकडून देण्यात आले आहे.
वॉर्डची पुनर्रचना करा
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दर ५ वर्षांनी होते. २०१७ मध्ये पालिकेच्या निवडणूकीपूर्वी २०१६ मध्ये भाजपा सरकराने मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डची पुनर्रचना केली. त्यात सुमारे ५० वॉर्डची पुनर्रचना करताना भाजपाला फायदा होईल याची काळजी घेण्यात आली होती. यामुळे ३२ नगरसेवक असलेल्या भाजपाचे २०१७ च्या निवडणुकीत ८२ नगरसेवक निवडून आले होते. आता पुन्हा पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असल्यास पुढील वर्षी फेब्रुवारीत पालिका निवडणूक होतील. त्याआधी भाजपने केलेल्या ४५ वॉर्डची पुन्हा पुनर्रचना करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. एखाद्याने पुनर्रचनेवर आक्षेप घेतल्यास निवडणूक आयोगाला वॉर्डची पुनर्रचना करावी लागेल, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
शेलार यांना रवी राजा यांचे प्रतित्युर
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील 30 वॉर्ड जे शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाही. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या, भाजपा तयार आहे, असे वक्तव्य केले आहे. यावर बोलताना शेलार यांनी भाजपाचे ३० जागा आहेत हे स्पष्ट केले आहे. इतर जागा त्यांनी वॉर्ड पुनर्रचनेतून जिंकल्या आहेत. या जागांवर आधी शिवसेनेचे नगरसेवक जिंकून यायचे त्या जागा भाजपाने जिंकल्या कशा, असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसला भाजपाचे आव्हान
रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी पत्र दिले आहे. २०१६ मध्ये वॉर्ड पुनर्रचना तत्कालीन शिवसेनेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्या समोर झाली आहे. रवी राजा यांनी पत्र दिले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. त्यांनी पालिकेच्या २२७ वॉर्डाची पुनर्रचना करावी आणि काँग्रेसच्या आता असलेल्या ३० जागा जिंकून आणाव्यात, असे खुले आव्हान भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट दिले आहे.
हेही वाचा - मुंबई महापालिकेचे कोविड मॅनेजमेंट मॉडेल प्रभावी, अन्य महापालिकांनी अनुसरण करावं - मुंबई उच्च न्यायालय