मुंबई - मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून, काही नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षांशी जवळीक साधली होती. मात्र, मिलिंद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली आहे. देवरा यांच्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण मुंबईत अल्पसंख्यक मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. या मतदारांमध्ये कोणताही वेगळा संदेश जाऊ नये, यासाठी काँग्रेस सोडून गेलेले अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष निजामुद्दीन रायन यांना पुन्हा अल्पसंख्याक सेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर नागपाडा आणि मुंबादेवी विधानसभा मतदार संघाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
संजय निरुपम यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माजी आमदार कृष्ण हेगडे, राजहंस सिंह, रमेश सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. त्यातच प्रिया दत्त आणि कृपाशंकर सिंह यांनीही पक्ष कार्यालयाकडे पाठ फिरवली होती. तर निजामुद्दीन रायन यांनीही अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्षपद सोडून नागपाड्यात एमआयएमशी जवळीक साधली होती.
मात्र, मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची सुत्रे हाती येताच, त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा सक्रिय करण्याची मोहीम आखली आहे. काँग्रेस सोडून गेलेले माजी आमदारही पुन्हा पक्षात परत येतील, असा विश्वास रायन यांनी व्यक्त केला आहे.