मुंबई - काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. शिवसेनेकडून काँग्रेससोबत येण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मात्र प्रस्ताव आल्यास त्यासाठी आम्ही दिल्लीत विचारून निर्णय घेऊ, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.
जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे थोरात म्हणाले. विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 अपक्ष आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता थोरात यांनी देखील १० अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या यापेक्षा जास्त जागा निवडून येतील असे नियोजन केले होते. आम्ही नियोजन पूर्वक प्रचार केला आमचे नेते राहुल गांधी यांनी राज्यात ५ सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभराच जोरदार प्रचार केला. त्यांच्या अनुभवाचा आम्हालाही फायदा झाला. आगामी काळात राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढू. १९ उमेदवार १०,००० पेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. नागपूर शहर काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मतदारांनी चांगला कौल दिला. मात्र, काही माध्यमांनी मतदान होण्यापूर्वी जो सर्व्हे जाहीर केला, त्यातून मोठी दिशाभूल करण्यात आली त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी भावनाही थोरात यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, जयंत पाटलांचा भाजपला टोला
थोरात यांनी पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेस पुन्हा मुळासकट उभी करावी लागणार असून येणाऱ्या काळात आम्ही जनतेसाठी चांगले काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.