मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील घटक पक्षांची पहिलीच बैठक पार पडली. यावेळी आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. दुष्काळ, लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधासभा निवडणुकीवर यावेळी चर्चा करण्यात आली, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आघाडीची आगामी दिशा ठरवण्यासाठी आमची ही पहिली बैठक महत्त्वाची होती. येत्या काळात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी आमची मानसिकता आहे, असे चव्हाण म्हणाले. विखे पाटील यांच्यासोबत आमदार जात नाहीत तर आमदार फोडण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, निवडणूक काळात ज्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने ते भाजपात जातील, असेही चव्हाण म्हणाले.
आम्ही पराभवाने खचणारे लोक नाही - राजू शेट्टी
आम्ही चळवळीतून वर आलो आहोत. आम्ही पराभवाने खचणारी लोकं नाहीत. पराजय झाला म्हणून आम्ही लढाई सोडणार नाही. अनेक प्रश्न आहेत, त्यावर काम करायचे आहे. तसेच लवकरच राज्यव्यापी आंदोलन सुरू केले जाईल. आम्ही पुढेही एकत्र येऊन लढणार आहोत, असे राजू शेट्टी म्हणाले.
वंचितची मानसिकता असेल तर त्यांचे स्वागत- जयंत पाटील
यावेळी आमच्यासोबत येण्यासाठी वंचितची मानसिकता असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही, तसेच मनसेच्या संदर्भात आज काही विषय झाला नाही, असे जयंत पाटील म्हणाले. राज्यात सर्व पक्ष एकत्रित आलो आहोत. परंतु, तपशिलात चर्चा झाली नाही, अनेक उमेदवारांनी बरेच आश्चर्य व्यक्त केले. एखादा विजय मिळाल्यास आमदारांना प्रलोभन निर्माण होते. परंतु, आमच्या पक्षात तसे काही झाले नाही. त्यामुळे आमच्याकडून कोणीही भाजपात जाणार नाहीत, असे पाटील म्हणाले.