मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की अन्य कोणत्या निवडणुका अथवा सभा असो जिथे जिथे भाजपाला ठोकता येईल तिथे उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसचे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी स्पष्ट केले आहे. ते आज मुंबईत बोलत होते. रमजान निमित्त होणाऱ्या इफ्तार पार्टी कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने आता भाजपा विरोधी पक्ष एकवटत असून ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी व्यक्त केली आहे.
इफ्तार पार्टीचे आयोजन : रमजाननिमित्त काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी कुर्ला काजू पाडा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडण्यासाठी जिथे जिथे जाणे शक्य होईल आणि लोकांपर्यंत सत्य पोहोचवता येईल तिथे तिथे आपण जाणार आहोत.
भाजपला ठोकणार : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी येणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला जिथे ठोकता येईल तिथे आपण नक्की जाणार. सध्या आपल्या देशातल्या राजकारण पाहिले तर, आपल्या मूलभूत समस्यांपेक्षा इथे हिंदू मुस्लिम या धार्मिक बाबींवर जास्त लक्ष दिले जाते. हीच धार्मिक तेढ संपवण्यासाठी अशा इफ्तारीचे आयोजन सर्वच ठिकाणी केले गेले पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र आहे. आपल्याला जर हे धार्मिक राजकारण थांबवायचे असेल तर इतर पक्षांनी देखील एकत्र यायला हवे, अशी प्रतिक्रिया जिग्नेश मेवाणी यांनी दिली.
सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार : यावेळी बोलताना माजी आमदार नसीम खान म्हणाले की, इफ्तार पार्टीला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आवर्जून उपस्थित होते. यापूर्वी हे चित्र पाहायला मिळत नव्हते. मात्र आता हे अतिशय दिलासादायक चित्र असून राज्यातील आगामी वाटचालीसाठी भाजपा विरोधात सर्वांची वज्रमूठ होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एफतार पार्टीला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.