मुंबई - अलिबाग येथील एका इंटिरियर डेकोरेटरची आर्थिक फसवणूक केल्यामुळे त्याला आत्महत्या करण्यास भाग पडले. असा आरोप रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना आज (दि. 4 नोव्हेंबर) सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच विविध माध्यमातील संघटनांनीही अर्णब गोस्वामींच्या अटकेचे समर्थन केले आहे. अर्णब यांची ही अटक वैयक्तिक कारणामुळे झाली असे काँग्रेसने स्पष्ट केले. तसेच या काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि अर्णब यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
जैसी करनी वैसी भरणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अर्णबची अटक ही जैसी करनी वैसी भरणी अशातला प्रकार आहे. माध्यमांमध्ये एक प्रकारचा दर्जा असतो, तो दर्जा या चॅनलमध्ये नव्हता हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांचे जे काही इतर दोष आहेत ते पोलीस शोधत आहेत. आज अर्णबला जी अटक झालेली आहे, ती वेगळ्या घटनेतून अटक झालेली आहे. त्याचा लोकशाहीवरील हल्ल्याचा काहीही संबंध नसल्याचेही मंत्री थोरात म्हणाले.
कायद्याच्या दृष्टीने योग्य तेच झाले
काँग्रेसच्या नेत्या व महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे ती कायद्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे झाली आहे. ज्यांच्यावर अन्याय त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलेले आहे, त्यामुळे अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली. या संदर्भात जे काय झाले आहे ते कायद्याच्या दृष्टीने योग्य झालेले आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होताना आपल्याला दिसत आहे, त्यासाठी काही लोक माध्यमाचा वापर करत होते. त्यामुळे जे झाले ते योग्य झाले अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.
हाथरसवर हे गप्प का होते?
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, माध्यम हे समाजाचा आरसा आहे. जनमानसांचे प्रश्न मांडण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, काही लोकांनी त्याचा गैरवापर सुरू केला होता. असे काही लोकही समोर आले. हे माध्यमाचे काम नाही, माध्यमांकडून घोषणा करणे हे योग्य नाही. पण, ते करण्यात आले. पोलीस आयुक्तांनीही माध्यमात कशा पद्धतीने बॅक ऑफिसमधून काम चालते यासाठीचा खुलासा केला होता. शिवाय हाथरस येथे घटना होते तेव्हा हे चॅनल एक शब्द बोलत नाही. मात्र, कंगणा रणौतवर मोठे विषय चालवले जातात. ज्या मुलीवर बलात्कार होतो, त्यावर एक शब्द निघत नाही, यामुळे पत्रकारितेचे मूळ उद्देश शाबूत राखला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - 'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामींना अटक!