मुंबई - फडणवीसांना 5 वर्षानंतर कळेल ३ चाकांची रिक्षा 'बुलेट ट्रेन'पेक्षा जास्त वेगाने धावत आहे, असा टोला काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी ही आघाडी तीन चाकांची रिक्षा आहे असे म्हटले होते. यावर पाटील यांनी अशाप्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. आज (बुधवारी) नवनिर्वाचीत विधानसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम विधानभवनात पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - अजित पवार परत येतील, हा विश्वास होता - रोहित पवार
मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्व पत्रकार परिषद घेतली. यात फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीला तीन पायाची रिक्षा असल्याचे म्हटले होते. ही रिक्षा तीन वेगवेगळ्या बाजूला धावणार आहे. असेही म्हटले होते. यावर सतेज पाटील यांनी उपरोधीक टोला लगावत बुलेट ट्रेनचा मुद्दा मांडला.
पाटील म्हणाले, आमचे सरकार शेतकरी, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यावर प्रभावीपणे काम करणार आहे. तसेच ज्यांनी काँग्रेसमुक्त करणार असल्याची घोषणा केली. तेच कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झाले. असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच पुराच्यावेळी भाजप दोन दिवसानंतर सक्रिय झाले. कोल्हापूरकरांची दुकाने, घरे, जनावरे वाहून गेली असताना भाजप मात्र, दुर्लक्ष करत होते. नुकसानग्रस्तांना मदतही तोकडी दिली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. पहिल्यांदा आम्ही महापोर्टल हे परिक्षा घेण्याचा प्लॅटफॉर्म बंद करणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते फडणवीस?
फडणवीस म्हणाले, 'नवे सरकार स्थापन करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल. कालच मी बघितलं जेव्हा शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. सत्तेसाठी किती मोठी लाचारी शिवसेनेच्या नेत्यांना स्विकारावी लागली आहे. पण त्यांची लाचारी त्यांना लखलाभ. भाजप आता राज्यात प्रखर विरोधीपक्षाचे काम करेल. जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू.”
हेही वाचा - आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही, आगे आगे देखो होता है क्या - सुप्रिया सुळे