मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून लिहिलेला 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी वाचला आहे काय, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय बाबासाहेबांचा 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ वाचूनच केला होता, असे वक्तव्य आठवलेंनी शुक्रवारी पुण्यात केले होते. त्याचा समाचार घेत मुणगेकर यांनी मोदी-आठवलेंवर सवाल करत जोरदार हल्लाबोल केला.
रामदास आठवले यांचे दलित पँथरच्या चळवळीनंतरचे राजकारण हास्यास्पद बनले आहे. ते कायम पक्षांकडे गयावया करून, तर कधी भीक मागून राज्यमंत्रीपद मिळवतात. या निवडणुकीनंतर आपल्याला कॅबिनेट मिळणार असल्याचा दावा ते करत आहेत. त्यासाठी आठवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचा उल्लेख करून दिशाभूल करत असून ते निषेधार्ह असल्याचे मुणगेकर म्हणाले.
आठवलेंना जे कळत नाही ते ही ते बोलत असतात. त्यामुळे ते हास्यास्पद ठरले आहेत. राज्यात आता आठवले -आंबेडकर यांच्या भूमिका मान्य नसलेला मोठा वर्ग आहे. राज्यघटना ज्या प्रवृत्तींनी जाळली त्यांच्यासोबत हे दोघेही उभे राहणे, हे अत्यंत खेदजनक आहे. भारतीय राजकारण हे अत्यंत निर्णायक वळणावर आल्यानंतर आठवले-आंबेडकर यांची भूमिका ही निषेधार्ह असल्याचेही मुणगेकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात ४८ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. केवळ आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. केवळ भाजपला फायदा व्हावा, या एकाच उद्देशाने त्यांनी उमेदवार दिले आहेत. मात्र, त्यांचा तो हेतू यशस्वी होणार नाही. राज्यात वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येऊ शकणार नाही, असा दावाही मुणगेकर यांनी केला.