मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सत्याचा प्रचार केला जात असल्याने मोदी आणि शाह या जोडीचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडत चालला आहे. यामुळे जनमत दूर चालल्याने, हतबलतेतून भाजपकडून राज ठाकरेंच्या सभेवर होणाऱ्या खर्चावर आक्षेप घेतला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आपला काहीही संबंध नाही, हे राज ठाकरे यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे.
मोदी-शाह यांच्या विचारधारेतून मुक्त होणे यातच देशहित आहे. याकरिता राज ठाकरेंच्या सत्य वचनाचे स्वागतच केले पाहिजे. मोदी शाह यांच्या विचारधारेमुळे जनतेच्या मनात भाजपबदद्ल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपचा घसरलेला पाय सावरण्याकरता भाजपमधूनही मोदी-शाह यांच्या विचारांची मुक्ती होणे आवश्यक आहे. म्हणूनच राज ठाकरेंमुळे देशहिताबरोबरच भाजपचे हित जोपासले जात असल्याने राज ठाकरेंच्या सभांचा खर्च भाजपने आपल्या नावावर उचलला तरी काय हरकत आहे? अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.