मुंबई : मंगळवारी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोवा राज्यातील मित्र पक्षांच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन्ही राज्याचे मिळून तब्बल 48 खासदार सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजप युती बाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'भाजपने नाही तर शिवसेनेने युती तोडली' असा मोठा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांच्या बैठकीत केला आहे.
तर, 'काँग्रेसने शरद पवार यांच्यावर अन्याय केला' असे देखील मोदी यांनी म्हटले आहे. या वक्तव्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले असून, 'म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली का?' असा उलट सवाल विचारला आहे. ध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून खासदार संजय राऊत देखील या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत.
दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "पंतप्रधान अजूनही सामना वाचतात. सामना हे उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यांनी पक्ष फोडला, इतर गोष्टी केल्या मात्र, त्यांना अजूनही शिवसेनेची दखल घ्यावी लागते. सामनातील भूमिका या शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत. त्यांना अजूनही यासाठी दखल घ्यावी लागते कारण आम्ही ओरिजनल आहोत.
सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत, हे त्यांनी अखेर बोलून दाखवले. राऊत पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेनेची साथ सोडली नाही, असे स्वतः पंतप्रधान म्हणत असतील तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. 2014 ला आपण वेगळे झालो. हे त्यावेळी एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल करून सांगितले होते. आपला मागचा इतिहास बघा. पंतप्रधान यांनी काही गोष्टी तपासून बोलावे.
किमान महापुरुषांच्या साक्षीने तरी असे मोडून तोडून बोलू नये. काँग्रेसने शरद पवारांवर अन्याय केला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत म्हटले. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, ते कधी शरद पवार यांना आपले मार्गदर्शक सांगतात. आता काँग्रेसने त्यांच्यावर अत्याचार केल्याचे बोलत आहेत. त्यांनी अत्याचार केला म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? तुम्ही तुमच्या पक्षातील बघा. इतकंच होत तर तुम्ही तुमचे नेते अडवाणी यांना मार्गदर्शक मंडळात का टाकलं? असा उलट सवाल देखील राऊत यांनी विचारला आहे.