मुंबई- सध्या कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काल कर्नाटकच्या दहा आमदारांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस व जेडीयूचे सरकार पडेल की काय असे चित्र निर्माण झालेले आहे. काल राजीनामा दिलेले आमदार मुंबईत सोफिटेल हॉटेल येथे आलेले आहेत. त्यांचे मन वळवण्यासाठी कर्नाटक काँग्रेसचे अल्पसंख्यांक अध्यक्ष काही वेळापूर्वी सोफिटेल हॉटेल येथे आले होते.
काँग्रेसचे अल्पसंख्यांक अध्यक्षांनी या आमदारांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न केले व ते पक्षाला सोडून कुठे जाणार नाहीत, असे त्यांनी काही वेळापूर्वी सांगितले. तसेच याच वेळी मुंबईचे भाजप आमदार प्रसाद लाड हे देखील या आमदारांच्या भेटीसाठी आले होते. आमदारांनी भाजपमध्ये यावे यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.
सध्या कर्नाटकात 224 विधानसभा सदस्य आहेत आणि यामध्ये भाजपचे 105 आमदार आहेत. काँग्रेस व जेडीयूने आपले पक्षीय बळ दाखवत सत्ता स्थापन केली होती. परंतु आता नुकतेच दहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार पडण्याची शक्यता आहे. ज्या दहा आमदारांनी राजीनामा दिला ते जर भाजपात आले तर भाजपचे कर्नाटकात सरकार स्थापन होईल. त्यासाठी या आमदारांची मनधरणी करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच काँग्रेस देखील आमदारांनी आपल्या पक्षाचा राहावे यासाठी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे.
आता हे राजीनामा दिलेले दहा आमदार काँग्रेसमध्येच राहतात की भाजपमध्ये जातात हे थोड्याच दिवसात कळेल. त्यावरूनच कर्नाटकमध्ये सत्ता कोणाची स्थापन होते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.