मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीनानं ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
करीनाने नव्या पुस्तकाच्या नावात 'प्रेग्नन्सी बायबल' असा शब्द वापरला आहे. त्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.
'प्रेग्नसी बायबल' वरून गदारोळ
करीना कपूरनं नुकतेच 'प्रेग्नन्सी बायबल' या नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकावर बायबल या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. बायबल शब्द वापरण्यात आल्यामुळे बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं आक्षेप घेतला आहे. करीना कपूरनं आपल्या पुस्तकावर बायबल शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघानं केली आहे. या तक्रारीबद्दल करीना कपूर आणि पुस्तक प्रकाशकांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ महिन्यानंतर वाराणसी दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार