मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई सीएनजी आणि पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची किंमत केंद्र सरकारने 110 टक्क्यांनी वाढवलेली आहे. त्यामुळे महानगर गॅस कंपनीकडून सीएनजी आणि पीएनजी दरात अनुक्रमे 7 आणि 5 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता महागाईची झळ पोहोचणार आहे.
मुंबईकरांचा खिशाला कात्री - राज्य शासनाने व्हॅटमध्ये कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, 1 एप्रिल, 2022 पासून देशांतर्गत उत्पादीत नैसर्गिक वायूची किंमत केंद्र सरकारने 110 टक्क्यांनी वाढवलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई सीएनजी आणि पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीची चांगलीच कोंडी झाली आहे. पाच दिवस वाट पाहिल्यानंतर दर कपात होत नसल्याने अखेर महानगर गॅस लिमिटेड कंपनीने मुंबईतील सीएनजी दरात 7 रुपये तर पीएनजी दरांमध्ये तब्बल 5 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
'या' कारणामुळे घ्यावा लागला निर्णय - महानगर गॅस लिमिटेडने मुंबईतील सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. राज्य शासनाने 1 एप्रिलपासून व्हॅट दर कपातीची अंमलबजावणी केल्यानंतर महानगरनेही तात्काळ दरकपात लागू केली होती. त्यामुळे सीएनजीचे दर 66 रुपयांवरून थेट 60 रुपयांवर खाली आले होते. याशिवाय पीएनजी दरातही 3.50 रुपयांची कपात करून कंपनीने दर 36 रुपयापर्यंत कमी केले होते. मात्र, केंद्र शासनाने 1 एप्रिलपासून नैसर्गिक वायूचे दर वाढल्यानंतर महानगराला आर्थिक फटका बसू लागला होता. त्यामुळे नाईलाजास्तव सीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करावी लागली आहे. आता नवीन दरानुसार सीएनजीचे दर 67 रुपये प्रतिकिलोपर्यंत तर पीएनजी दर 41 रुपये प्रति एससीएमपर्यंत असणार आहे.