मुंबई - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हवामान आणि पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील विद्यार्थ्यांना समृद्ध पर्यावरणाची शपथ देणार आहेत. मुख्यमंत्री मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे २२ जानेवारी रोजी सकाळी साडे १० वाजता शपथ देतील. या शपथेचे थेट प्रसारण दूरदर्शनसह ईतर माध्यमांकडून केले जाणार आहे. राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी हा कार्यक्रम राज्यातील विविध शाळांमध्ये दाखवला जाणार असून त्यासाठीचे आदेश शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शाळांना दिले आहेत.
या कार्यक्रमाच्या वेळी राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अवगत करावे, असे आदेशच शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री ही देणार शपथ.....
स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे... ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे..
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आज संकल्प व निश्चय करतो की, माझ्या दैनंदिन जीवनशैलीत मी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेईन. याकरता प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करेल. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे त्याची बचत करेल.
घरातील ओला व सुका कचरा वेगळा करेल व ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खत करेल. माझ्या सभोवतालच्या नैसर्गिक जलस्रोतांचे म्हणजेच विहिरी, तळे,नदी अशा पाणवठ्यांचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेईल. मी असे वचन देतो की, नैसर्गिक अधिवासात वास्तव्य करणारे प्राणी, पक्षी, जलचर व जैवविविधता यांचे मी संरक्षण करेन.
आम्ही असा संकल्प करतो की समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी वाढदिवसाला किमान एक झाड लावेल व त्याचे नित्यनियमाने संगोपन करेल. आम्ही भारतीय प्रजासत्ताकाचे सर्व विद्यार्थी व सर्व सुजाण नागरिक शपथ घेतो की आजपासून पर्यावरणपुरक दैनंदिन जीवन व्यतीत करण्याचा निश्चय करीत आहोत.