मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी, असे आवाहन केले आहे. अद्यापही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संयम पाळणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी जनतेला हे आवाहन केले आहे.
आपत्तीग्रस्तांना निकषापलिकडे जाऊन वेगाने मदत
'जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीला महाराष्ट्र मोठ्याप्रमाणात सामोरे गेला. रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसला. विक्रोळी, चेंबूर येथे दरडी कोसळल्या. तळीये गावात अनेकांनी जीव गमावले. या घटना दुर्देवी आहेत. परंतू या सर्व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषांपलिकडे जाऊन अधिकची मदत निसर्ग, तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना केली. तशीच आताही ती करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाने ११ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले.
पूर आणि दरडग्रस्त भागासाठी कायमस्वरूपी धोरण आखणार आहे. दरडप्रवण, पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सर्वंकष कायमस्वरूपी धोरण आखणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवावी
'50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथील करण्याची पंतप्रधानांना विनंती केली आहे. याबाबत अद्याप केंद्राची भूमिका स्पष्ट नाही. केंद्राने १०२ व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत या प्रस्तावाचा उपयोग नाही. त्यामुळे ही मर्यादा उठवावी व राज्याला आरक्षणाचे अधिकार द्यावेत, अशी राज्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडे इम्पेरिकल डेटाची मागणी केली आहे', असे ठाकरेंनी म्हटले.
कोरोनाशी मुकाबला सुरुच
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख, दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक बाधित झाले. तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने आपली तयारी केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दरम्यान, त्यांनी २ चाचणी प्रयोगशाळांची संख्या आता ६०० वर गेल्याचे, विलगीकरण रुग्णशैय्यांची संख्या ४.५ लाखांहून अधिक केल्याची माहिती दिली.
राज्यात आयसीयूच्या ३४ हजार ५०७ तर ऑक्सिजनच्या १ लाख १० हजार ६८३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. १३५०० व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत असेही ते म्हणाले.
जिनोम सिक्वेन्सींग लॅब -
विषाणू आपला अवतार झपाट्याने बदलत आहे. त्याचे परिणाम लक्षात घेऊन वेळेत उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेन्सींग लॅब सुरु केली आहे. याचा राज्यालाही उपयोग होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काही ठिकाणी निर्बंध शिथील पण...
राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे. ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवत आहोत.
कंपन्यांनी कामगारांच्या राहण्याची सोय करावी- ठाकरे
अनेकांनी यादिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे. शक्य असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी, अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले. म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे असल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, उद्या मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे.
विरोधी पक्षाडून स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे विरोधी पक्ष भाजपने स्वागत केले आहे. 'हा निर्णय स्वागतार्ह आहे. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून भाजप महाराष्ट्राने केलेल्या आंदोलनाचे हे यश आहे. मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे 'देर आए, दुरुस्त आए।'', अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. वाचा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, 15 ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल सुरू
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वेगवेगळ्या स्टेशनवर भाजप नेत्यांकडून सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवास मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. किमान लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना तरी लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी प्रमुख मागणी विरोधी पक्षांने लावून धरली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोधी पक्षाकडून देखील स्वागत होत आहे.
हेही वाचा - Pune Unlock : पुणेकरांसाठी खुशखबर! विकेंड लॉकडाऊनही नाही