मुंबई - राज्यामध्ये जेव्हा पहिला कोरोना रूग्ण सापडला तेव्हाची आणि आताची आरोग्य व्यवस्था यात जमीन आसमानाचा फरक आहे. यात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. प्रत्येक आरोग्य सुविधा उभारण्यात आणि औषधांच्या वापरात आपण जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, कोरोना योद्धांना लढण्यासाठी शस्त्र आणि आयुधे पुरवण्याचे काम आपण करत आहोत. मुंबईत 'चेस द व्हायरस' मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फेज 2 आणि ठाण्यातील कोविड रुग्णलाचे इ-लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ठाकरे म्हणाले की, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनमधील योग्य उपाययोजनांमुळे धारावी आणि मालेगावचा कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यात सरकारला यश आले आहे. कोरोनाच्या उपायोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी मान्यवर सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत. याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे. मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत १००० खाटांच्या सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते, ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयुची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधानांशी संवाद साधताना देऊ, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात डॉक्टर्स, नर्स हे कोरोना योद्धे लढत आहेत त्यांना आयुधे म्हणून ह्या आरोग्य सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण रुग्णालये आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दाट लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षांवरील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे. यामुळे अशा व्यक्तींना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वेळीच रोखणे शक्य होईल. ट्रॅकींग, ट्रेसिंगचा मालेगाव आणि धारावीमध्ये यशस्वी झालेल्या प्रयोगाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री मदतनिधीसाठी एका ८५ वर्षांच्या महिला डॉक्टरांनी आज सकाळी धनादेश सुपूर्द केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महिला म्हणजे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राजीव यांच्या मातोश्री असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्यांना मनापासून नमस्कार करतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
*असे आहे बीकेसीवरील टप्पा २ रुग्णालय -
एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याचठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरीक्त १२०० खाटांचे आयसीयु, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले. त्याचा आज हस्तांतरण सोहळा झाला आहे. हे रुग्णालय आज मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले. येथे १०८ बेडस् आयसीयूचे असून १२ बेडस् डायलेसिससाठी आहेत. तर, ४०६ बेडस् विना ऑक्सिजन आणि ३९२ बेडस् ऑक्सिजन सुविधायुक्त आहेत.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण सदर हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून दर दिवशी सुमारे ३० रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत. डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (फेज-२) येथे व्हेंटीलेटर मशिन (३०), डायलिसिस मशीन (१८), आयसीयू बेड (५ फंक्शन मोटराईझड बेड (१०८), पेशंट वॉर्मर, सिटीस्कॅन मशिन, आर. ओ. सिस्टीम (१२५० LPH ), क्वारंटाईन बेड्स, ऑक्सिजन पाईप लाईनचे कनेक्शन, नॉईसलेस सेक्शन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ई.सी.जी. मशिन, पल्स ऑक्सीमीटर, कम्प्युटर रॅडिओलॉजी सोल्युशन्स, अशा प्रकारची वैद्यकीय उपकरणे आहेत.
*२४ दिवसांमध्ये रुग्णालयाची उभारणी - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
ठाणे कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अवघ्या २४ दिवसांमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे हे रुग्णालय आहे. आयसीयू बेड, डायलिसीस, प्रयोगशाळा, सीटस्कॅन, एक्सरे आदी सर्व सुविधा याठिकाणी आहेत. याकामासाठी एमएमआरडीएसह १९ विकासकांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितेल. कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी येथे अशा प्रकारची रुग्णालये उभारण्याचे काम सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हे हॉस्पिटल ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. त्यातील ५०० बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. तर, ७६ बेड्स हे आयसीयूचे असून १० बेड्स डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेड्स ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेडस् निर्माण करता येऊ शकतात, असेही शिंदे यांनी सांगितले.