मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेतून ४० आमदारांसह बाहेर पडले व त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना हे नाव व पक्ष चिन्ह बहाल केले. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये आम्हाला परत द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. आता ते पैसे एकनाथ शिंदे यांनी परत केले आहेत. यानंतर बोलताना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं प्रेम हे शिवसैनिक किंवा जनतेच्या कामावर नसून फक्त पैशावर आहे, असा उपरोधक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
'त्यांना पैसे मागण्याचा नैतिक अधिकार नाही' : 'निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्य बाण हे अधिकृत चिन्ह आम्हाला दिले आहे. शिवसेना हा आमचाच अधिकृत पक्ष आहे. ते पैसे मागण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. शिवसैनिकांच्या घामाचे ते पैसे आहेत. त्यांनी आमच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली व आम्ही ते पैसे परत केले', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
वारंवार 50 खोक्यांचा आरोप : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर वारंवार 50 खोक्यांचा आरोप लावला जात होता. मागील वर्षभर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात '५० खोके एकदम ओके' अशा घोषणा दिल्या. त्यातच ठाकरे गटाने शिवसेनेच्या अधिकृत खात्यात असलेल्या ५० कोटी रुपयांची मागणी बँकेकडे केली. परंतु ते अधिकृत खातं आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे बँकेनी सांगितले. बँकेने याबाबत एकनाथ शिंदेंकडे विचारणा केली. त्यानंतर शिंदेंनी हे पैसे ठाकरे गटाला तत्काळ परत देण्याचा निर्णय घेतला.
शिवसैनिकांच्या घामाचे पैसे : यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही पक्षातून बाहेर पडल्यावर आमच्यावर गद्दार, धोकेबाज, खोकेबाज असे अनेक आरोप झाले. आज ४० आमदार, १० अपक्ष आमदार, १३ खासदार, उपसभापती, लाखो कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांना आहे. मी सांगितलं होतं की शिवसेनेच्या कुठल्याही प्रॉपर्टीवर मी दावा करणार नाही. त्यांचे ५० कोटी त्यांना परत दिले आहेत. ते शिवसैनिकांच्या घामाचे पैसे आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा :